वृत्तसंस्था : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (ईपीएफओ)शी संबंधित काही सुधारणा जारी केल्या आहेत. ईपीएफओने आता ‘पासबुक लाइट’ ही एक नवीन सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत ईपीएफओ खातेधारक आता एकाच क्लिकद्वारे त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. या नवीन ईपीएफओ सुधारणांबाबत पत्रकारांशी बोलताना कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओने त्यांच्या खातेधारकांच्या पोर्टलवर ‘पासबुक लाइट’ नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामुळे खातेधारकांना त्यांच्या खात्यासाठी एक व्यापक पासबुक पाहता येईल. यामध्ये त्यांचे योगदान, पैसे काढणे आणि नवीन शिल्लक रक्कम थेट त्यांच्या पोर्टलवरच दिसेल.
‘पासबुक लाइट’ हा ईपीएफओ वेबसाइटवर उपलब्ध असलेला इंटरफेस आहे. या फीचरद्वारे खातेधारक कोणत्याही गुंतागुंतीच्या लॉगइन प्रक्रियेशिवाय थेट त्यांचे पीएफ बॅलन्स तपासू शकतात. याआधी खातेधारकांना यूएएन क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा टाकावा लागत असे. मात्र, आता ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. खातेधारकांना फक्त त्यांचा यूएएन क्रमांक आणि ओटीपी टाकावा लागेल आणि त्यानंतर ते त्यांचे पासबुक पाहू शकतात. म्हणजेच पासबुक पाहण्यासाठी पूर्वीसारखं लॉगइन करावं लागणार नाही.
- आधी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला http://www.epfindia.gov.in भेट द्या.
- त्यानंतर पासबुक लाइट ऑप्शनवर क्लिक करा
- आता तुमचा यूएएन क्रमांक टाका
- आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल
- तो ओटीपी टाकून सबमिट करा
- तुमचे पीएफ पासबुक स्क्रीनवर तुम्हाला दिसेल







