मुंबई : गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी परिसरात संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरीक संघ तर्फे आयोजित करण्यात आलेले NCMC स्मार्ट कार्ड शिबिर २० मे रोजी उत्साहात पार पडले. एसटी परिवहन विभागाच्या सहकार्याने आयोजित या विशेष शिबिरामध्ये संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ तसेच विसावा ज्येष्ठ नागरिक संघातील अनेक सभासदांनी सहभाग घेत या योजनेचा लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड सुविधेबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सुविधांचा अधिक सुलभ लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
या शिबिराचे आयोजन फेस्कॉमचे अध्यक्ष अन्नासाहेब टेकळे, आरोग्य समितीचे विवेक देशपांडे तसेच मुंबई विभाग फेस्कॉम अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल संघाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत खामकर पशुही विशेष सहकारी. संघाचे अध्यक्ष दिलीप धारकर यांनी भविष्यातही अशाच प्रकारचे सहकार्य संघाला मिळत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिबिरात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.







