मुंबई : मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने कॅशलेस आणि वेगवान तिकीट खरेदीसाठी प्रवाशांना RailOne या मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वेकडून प्रवाशांना तिकीट खरेदी आणि इतर रेल्वे सेवांसाठी RailOne App वापरण्यास प्रोत्साहन देत असून यासाठी खास ऑफर दिली आहे.
डिजिटल पेमेंट मोडमधून RailOne ॲपद्वारे अनारक्षित तिकिटं बुक करणाऱ्या प्रवाशांना १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ पर्यंत खास सवलत मिळणार आहे. RailOne मधून तिकीट काढणाऱ्यांना ३ टक्के सूट मिळेल. पण हे तिकीट किंवा पास काढताना कोणत्याही ऑनलाइन पेमेंट ॲपचा वाप करता येणार नाही. ३ टक्के सूट मिळवण्यासाठी RailOne ॲपच्या आर-वॉलेटद्वारे पेमेंट करावं लागेल. याच ऑनलाइन मोडद्वारे पेमेंट केल्यानंतर ३ टक्के कॅशबॅक मिळेल. ही ऑफर केवळ अनारक्षित तिकिट बुकिंगसाठी लागू आहे. पुढील सहा महिने ही सवलत देण्यात येणार आहे. सध्या यूटीएस अॅप वापरणाऱ्या प्रवाशांना लोकल ट्रेनचा पास यूटीएस अॅपमधून काढता येत नाही. पण आता एकाच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विविध सेवांचा लाभ घेता यावा आणि कोणत्याही समस्येशिवाय प्रवाशांना तिकिटं तसंच पास काढणं सुरू ठेवण्यासाठी यूटीएसमधून रेलवन अॅपमध्ये स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यूटीएस अॅपमधून RailOne मध्ये स्थलांतर होताना युजर्सला अधिकृत मार्गदर्शनात दाखवल्याप्रमाणे सोप्या स्टेप्सद्वारे क्रेडेन्शियल्स वापरता येतील.







