मुंबई : मुंबईत डबल डेकरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने एक गारेगार गिफ्ट दिलं आहे. आजपासून सीएसएमटीहून सकाळी पावणे नऊला पहिली बस सुटली असून शनिवार, रविवार डबलडेकर बसमधून हेरिटेज टूर चालवण्यात येणार आहे. दरम्यान सध्या ही बस सीएसएमटी स्टेशन ते एनसीपीए या मार्गावर चालवली जाणार आहे. सकाळी ८.४५ ते रात्री १०.३० या वेळेत ही बस धावणार आहे. या बससाठी रूट नंबर ११५ असणार आहे. या एसी डबलडेकर बसचं भाडं देखील सामान्यांच्या आवाक्यातील आहे. पहिल्या ५ किमी साठी केवळ ६ रूपये आकारले जाणार आहेत. मुंबईच्या रस्त्यावर अशा २०० बस उतरवण्याचा मानस आहे.
पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात ७ वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस आहेत. एकूण ६५ आसनव्यवस्था असलेली ही डबल डेकर बस आहे. सध्या दोनच बस मुंबईकरांच्या सेवेत येणार असून पुढच्या आठवड्यापर्यंत आणखी ७ ते ८ बस सेवेत येतील. तसंच मार्चअखेर २०० एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ होतील. या बसचं तिकिट सर्वसामान्यांना परवडेल असं आहे. या वातानुकुलित बसचं कमीतकमी तिकिट ६ रुपये आहे. स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून देखील तिकीट काढता येणार आहे.
अशा आहेत सुविधा…
- सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहेत.
- चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था लेली आहे.
- दोन्ही बाजूंना स्वयंचलित दरवाजे असणार आहेत.
- दरवाजे उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असणार आहे.