मुंबई : मुंबईत १९९३ प्रमाणे पुन्हा बॉम्बस्फोट करू,असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. नबी याहया खान ऊर्फ के. जी. एन. लाला असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी मुंबईमध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे १२ गुन्हे दाखल असून सन २०२१ मध्ये त्याला मालाड पोलिस ठाण्यामार्फत तडीपार करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस नियंत्रण कक्षास कॉल करून मुंबई शहरात बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देणाऱ्या इसमास दहशतवादविरोधी पथकाने शोधून काढले आहे. ७ जानेवारी रोजी रात्री ७.३० च्या सुमारास एका इसमाने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १०० नंबर हेल्पलाईनवर कॉल करून १९९३ ला जसा बॉम्बस्फोट झाला, तसा बॉम्बस्फोट दोन महिन्यानंतर मुंबईमध्ये माहीम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा या ठिकाणी करू. मुंबईमध्ये १९९३ सारख्या दंगली घडवून आणू. यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्ब स्फोट व दंगली करण्यासाठी बोलवले आहे, अशी धमकी दिली होती. त्या कॉलच्या अनुषंगाने दहशतवादविरोधी पथकाची दोन पथके तयार करून चौकशीसाठी रवाना करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपीस अटक करण्यात आली.