नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये आक्रमक भूमिका राबवत जगभरातील विविध देशांवर टॅरिफ लादलं. ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचं आश्वासन मतदारांना दिलं होतं. त्यानुसार ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादलं होतं. भारतावर ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादलं आहे. विविध देशांवर टॅरिफ लादून मिळालेल्या कमाईतून ट्रम्प आता देशातील नागरिकांच्या खात्यात पैसे पाठवणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवर एक मोठी घोषणा केली. लवकरच बहुतांश अमेरिकन नागरिकांच्या खात्यात टॅरिफ लाभांश म्हणून २००० अमेरिकन डॉलर्स पाठवणार आहे. भारतीय रुपयात त्याचा विचार केल्यास ही रक्कम १ लाख ७७ हजार २६९ रुपये होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रथ सोशलवर लिहिलं की अमेरिका आता टॅरिफद्वारे कित्येक ट्रिलियन डॉलर्स कमाई करत आहेत. हे अमेरिकेवरील ३७ ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज कमी करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे. ट्रम्प यांनी हे जाहीर केलं नाही की ते नागरिकांच्या खात्यात कधी रक्कम पाठवणार आहेत. ट्रम्प त्यांच्या ट्रथ सोशल प्लॅटफॉर्मवर म्हणाले, टॅरिफचा विरोध करणारे लोक मूर्ख आहेत. आपण आता श्रीमंत देश, अधिक सन्मान असणारा जगातील देश बनलो आहोत. आता महागाई नाही, स्टॉक मार्केटचं मूल्यांकन विक्रमी झालंय. आपण आता कित्येक ट्रिलियन्सची कमाई करत आहोत, लवकरच आपल्यावरील ३७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचं करंज भरणार आहोत. विक्रमी गुंतवणूक अमेरिकेत, इथल्या प्रकल्पात आणि कारखान्यात होत आहे. आता अमेरिकन नागरिकांना २००० डॉलर्स रक्कम दिली जाईल. यामध्ये उच्च उत्पन्न गटातील लोकांचा समावेश नसेल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ज्याप्रमाणं भारतात पीएम किसान, महाराष्ट्रात लाडकी बहीण अशा योजना सुरु आहेत,त्या प्रमाणेच ट्रम्प नागरिकांच्या खात्यात थेट रक्कम पाठवणार आहेत.







