वसई : वसई विरार शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ लागला आहे. नुकताच वसईच्या राजोडी परिसरात घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीर पणे भरत असल्याचा प्रकार पुरवठा विभागाने उघड केला आहे. यात ५२ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. वसई विरार शहरात वाढत्या लोकसंख्येसोबतच गॅस सिलेंडरची मागणी वाढू लागली आहे. विशेषतः घरगुती गॅस सोबतच व्यावसायिक सिलेंडरला ही जास्त मागणी असून ते चढ्या भावाने काळ्याबाजारात विकण्याचे प्रकार सुद्धा वाढू लागले आहेत. नुकताच वसई पश्चिमेच्या राजोडी येथे सहारा जीवन केंद्राच्या समोर असलेल्या घोड्यांच्या तबेल्यात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या मिळालेल्या माहिती नुसार पुरवठा विभागाने बुधवारी धाड टाकली. यात घरगुती गॅस मधून बेकायदेशीर व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले आहे.
नालासोपारातील दोन गॅस एजन्सी मध्ये गॅस पोहचविण्याचे (डिलिव्हरी) म्हणून काम करणाऱ्या क्षत्रगुण वाघमोडे व अमोल हाके या दोघांनी ५२ सिलेंडर घरगुती सिलेंडर ग्राहकांना वितरण करण्यासाठी घेतले होते. मात्र त्यांनी ते वितरित न करता बेकायदेशीरपणे व्यावसायि क गॅस सिलेंडर मध्ये भरुन त्याचा काळाबाजर करीत असल्याचे पुरवठा अधिकारी भागावत सोनार यांनी सांगितले आहे. या कारवाईत ५२ सिलेंडर, इलेक्ट्रीक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार व रबरी पाईप तसेच पिकप टेम्पो असा ६ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात बी. एन एस कायदा २०२३ चे कलम २८७, २८८ जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३,७ एलपीजी (पुरवठा वितरण नियम) २००० चे कलम ३,४,५,६,७ तक्रार दाखल करण्यात आल्याचे भागवत सोनार यांनी सांगितले आहे. पुरवठा विभागाने दिलेल्या तक्रारी नुसार अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे.







