मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची अद्याप १२ हजारांहून अधिक घरे रिक्त आहेत. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही कोकण मंडळातील आजही १२ हजारांहून अधिक घरे रिक्त आहेत. त्या घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी म्हाडाने आणखी एक उपाय योजला आहे. अर्जदारांना बँकेच्या पायऱ्या न चढता सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार मंडळाने एका कंपनीची गृहकर्ज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. आता इच्छुकांना, अर्जदारांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यास सुरूवात करण्यात आली.
सर्वच्या सर्व रिक्त घरे येत्या सहा महिन्यात विकण्याचे उद्दिष्ट आता कोकण मंडळाने ठेवले आहे. त्यानुसार बुक माय होमसह इतर पर्यायाद्वारे करण्यात येणाऱ्या विक्रीला चालना देण्यासाठी आता मंडळाने गृहकर्ज सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या सुविधेमुळे नक्कीच येत्या काळात मोठ्या संख्येने इच्छुक कोकण मंडळातील घराच्या खरेदीसाठी पुढे येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या सर्व ठिकाणच्या घरांना इच्छुकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने हजारोंच्या संख्येने घरे विक्रीवाचून रिक्त पडून आहेत. घरे महागडी असल्याने किवा प्रकल्पात आवश्यक त्या सुविधा नसल्याने, प्रकल्पाचे ठिकाण योग्य नसल्याने नागरिकांनी घरांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच कोकण मंडळातील अंदाजे २० हजार घरे पडून होती. घरे विकली जात नसल्याने मंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा प्राधिकरणाने नवीन धोरण स्वीकारून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला.







