मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) वाहनचालकांसाठी एक आगळावेगळा अनुभव देणारी अभिनव संगीत संकल्पना तयार करण्यात आली आहे. या रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या संगीत मार्गावरील (मेलोडी रोड) पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याची धून कानी पडते. जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग असलेल्या या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, या प्रयोगावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी याविरोधात काल पोस्ट केल्यानंतर आज मनसेचे काही कार्यकर्ते कोस्टल रोडवर जमले. त्यांनी या गाण्याचा निषेध केला. महाराष्ट्रात जय हो गाणं लावण्याऐवजी महाराष्ट्र गीत का लावलं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच, हे गाणं बदललं नाहीतर भविष्यात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे. मनसेचे पदाधिकारी म्हणाले, आम्ही फक्त सिग्नल दिला आहे. येत्या काळात यावर विचार केला नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन करू. महाराष्ट्रात अनेक प्रश्न असताना ही नाटके चालू आहेत. ‘जय हो…’ कोणाचा? अमित शाहांचा, मोदींचा की दिल्लीश्वरांचा? महाराष्ट्रात मराठी गीत किंवा महाराष्ट्र गीत लावा. जाणीवपूर्वक मराठी लोकांना डिवचण्याचा हा प्रयत्न आहे.







