सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठाअंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी दिशा मिळणार असून, हे अध्यासन मालवणात स्थापन होणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
या निधीमधून सिद्ध होणारे अध्यासन केंद्र ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध, व्याख्यानमाला, युवा संशोधकांना मार्गदर्शन आणि सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट या चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण अशा बहुआयामी उपक्रमांसाठी कार्य करणार आहे. शिवकालीन व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागातील ऐतिहासिक दाखल्यांचा सखोल अभ्यास होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा व्यापक प्रसार करण्यास हे अध्यासन हातभार लावेल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला १२ एप्रिल २०२५ ला ३५८ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या गडावरील सांस्कृतिक कार्यक्रमात आशिष शेलार यांनी या अध्यासनाची घोषणा केली होती. पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप प्रदेश सचिव प्रमोद जठार, भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, यांनी याबाबत मालवणमधील तज्ज्ञांशी चर्चा करून सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याचा अभ्यास करून शासनाने या अध्यासनाची रचना केली आहे.






