पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १९ ते २३ जानेवारी दरम्यान पुणे शहरात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कॉलेज आणि शाळांना १९ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता या स्पर्धेसाठी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केला आहे.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर- २०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या टप्प्याच्या दिवशी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व प्रकारच्या सरकारी आणी खाजगी शाळांना बुधवारी २१ जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत. येतोय २१ जानेवारी तसंच २३ जानेवारी रोजी पुण्यात सुरू असलेल्या ग्रँड सायकल टूर च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक रस्ते हे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. बुधवारी पुण्यातील कॅम्प परिसरासह नांदेड सिटी भागातील काही रस्ते सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच २३ जानेवारी रोजी या सायकल स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या निमित्ताने पुण्यातील मध्यवर्ती भागातील अनेक प्रमुख रस्ते ज्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर परिसराचा सुद्धा समावेश आहे. या ठिकाणी रस्ते सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत बंद राहतील अशी माहिती सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आज दिली. ज्या रस्त्यावरून ही सायकल रेस जाणार आहे ते रस्ते अंदाजे ३० मिनिटानंतर पुन्हा नागरिकांसाठी खुले केले जातील. तसंच नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलं आहे.







