पुणे : महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केलेल्या आरोपीने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. पळून गेलेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेश रावसाहेब कांबळे (वय- ३७ रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हातातील बेड्यासह २ ऑगस्ट २०२३ रोजी पळून गेला होता. त्याला शनिवारी (दि.२०) पहाटे बीड जिल्ह्यातील केज येथून शिताफीने अटक केली आहे. कांबळे याच्याविरुद्ध खून, खुनी हल्ले आणि लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्याविरुद्ध दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का ) कारवाई करण्यात आली होती. यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. राजेश कांबळे याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सुनावणीसाठी २ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर न्यायालयात येरवडा कारागृहातून पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले होते. त्याची न्यायालयीन सुनावणी संपल्यानंतर त्याला पुन्हा येरवडा कारगृहाकडे घेवून जात असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता.
फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता. हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून आरोपीचा तांत्रिक तपास केला जात असताना आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथे लपून बसल्याची माहिती पोलीस अंमलदार संदीप राठोड व अजित मदने यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने केज येथे जाऊन शनिवारी पहाटे आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव यांच्या पथकाने केली.





