भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र सहज शोधता यावे, यासाठी महापालिकेने गुगल मॅप आणि क्यूआर कोडसारख्या आधुनिक डिजिटल प्रणालींचा वापर करून मतदान केंद्रांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या सुविधेमुळे एका क्लिकवर मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे.
आगामी मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी एकूण ८ लाख १९ हजार १५१ मतदार मतदान करणार असून, यासाठी ९५८ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणुकीत ४३४ उमेदवार रिंगणात असून २४ प्रभागांमधून ९५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते २३ मधून प्रत्येकी ४ सदस्य, तर प्रभाग क्रमांक २४ मधून ३ सदस्य निवडले जाणार आहेत. मतदान प्रक्रिया १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार आहे. प्रत्येक पात्र मतदाराने मतदानापूर्वी क्यूआर कोड किंवा गुगल मॅप लिंकद्वारे आपले मतदान केंद्र तपासून योग्य ठिकाणी वेळेत पोहोचून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






