नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी घसरण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. लखनौ येथे आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभात बोलताना मोदी म्हणाले की, वर्षभरापूर्वी त्यांनी देशवासीयांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय एक वर्ष सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. आता सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने अनेक नागरिक आपले आभार मानत असल्याचा दावा त्यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आणखी एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युद्धकाळात अन्नटंचाईच्या पार्श्वभूमीवर दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना दिवसातून एक वेळ जेवण करण्याचे केलेले आवाहन आठवत स्वतःच्या आवाहनाची तुलना त्यांच्याशी केली. मोदी यांच्या या वक्तव्यानंतर व्यापारी आणि उद्योजकांची संघटना ‘चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री’ (सीटीआय)ने त्यांचे पत्राद्वारे आभार मानले. संघटनेचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी सोने खरेदी टाळण्याचा सल्ला दिला तेव्हा सोन्याचा दर सुमारे १ कोटी ९० लाख रुपये प्रति किलो होता, जो आता सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांवर आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळल्याचा दावा त्यांनी केला. तसेच लग्नसराईच्या हंगामात कमी झालेल्या दरांचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांनाही होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या त्यागाशी तुलना करणे अयोग्य असल्याचे सांगत, सोन्याच्या दरातील घसरण ही मोदींच्या आवाहनामुळे नव्हे तर जागतिक आर्थिक घडामोडींमुळे झाल्याचा दावा केला. अमेरिकन डॉलरची मजबुती, रुपयातील चढ-उतार, अमेरिकेतील वाढते व्याजदर, नफावसुली आणि गोल्ड ईटीएफमधील विक्री यामुळे सोन्याच्या किमती कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही मोदींवर निशाणा साधत, सामान्य नागरिकांना सोने खरेदी न करण्याचा सल्ला देण्याऐवजी मोठ्या उद्योगसमूहांबाबत भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. त्यांनी आर्थिक धोरणांवरही प्रश्न उपस्थित केले. दुसरीकडे, जागतिक बाजारात सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात सुमारे ९.५ टक्क्यांची घसरण झाली असून, ही १४ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. आठवडाभरात सोन्याच्या किमतीत सुमारे १२ हजार ५४० रुपयांची घट झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाल्याने काही गुंतवणूकदारांनी नुकसान भरून काढण्यासाठी सोन्याची विक्री केली. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्यावर विक्रीचा दबाव वाढून दर घसरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

