नवी दिल्ली : ऑनलाइन फूड डिलिव्हरी, कॅब सेवा आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी केंद्र सरकार सामाजिक सुरक्षा योजना आणण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित योजनेअंतर्गत ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या सुमारे १५ लाख कामगारांना पेन्शनसह विविध विमा आणि कल्याणकारी लाभ देण्याचा विचार सुरू आहे. या योजनेचा लाभ स्विगी, झोमॅटो, उबर, ओला, रॅपिडो, अर्बन कंपनी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या पात्र कामगारांना मिळू शकतो.
प्रस्तावित योजनेमध्ये वृद्धापकाळासाठी पेन्शन, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत, महिला कामगारांसाठी प्रसूती लाभ, आरोग्य विमा आणि जीवन विम्याचा समावेश असण्याची शक्यता आहे. एखाद्या कामगाराचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबालाही आर्थिक संरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो गिग कामगारांना प्रथमच व्यापक सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सध्या ही योजना प्रस्तावित टप्प्यात असून, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत या योजनेची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, लाभासाठीची पात्रता, नोंदणी प्रक्रिया, आर्थिक योगदान आणि अंमलबजावणीची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.

