मुंबई : सांताक्रूझ (पूर्व) येथील सीएसटी रोडवरील ‘विंडसर’ इमारतीच्या सातव्या मजल्यावर बुधवारी सकाळी ६ वाजता आग लागली. सुमारे एक ते दीड हजार चौरस फूट जागेत ही आग पसरली होती. मुंबईमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच असून सांताक्रूझ येथील ‘विंडसर’ इमारतीत बुधवारी पहाटे आग लागली. या आठ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती. या आगीत विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणे, फर्निचर, लाकडी सामान, सर्व्हर पॅनल, बॅटरी पॅनल व कार्यालयीन दस्तऐवज जळून खाक झाले. आग सुमारे एक हजार ते दीड चौरस फूट परिसरात पसरली होती. संपूर्ण मजल्यावर प्रचंड धूर पसरल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.
घटनेची मााहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग स्तर १ ची असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि विद्युतपुरवठा कपंनीचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. मुंबईत दोनच दिवसांपूर्वी गोरेगावच्या चित्रनगरीत आग लागली होती. तसेच मरीन लाईन्स येथेही आग लागली होती.





