मुंबई : कांदिवली पश्चिम येथील मथुरादास मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग (एस.व्ही. रोड) जंक्शन परिसरातील तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागाने मंगळवारी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी २७ बांधकामे निष्कासित करून या प्रकल्पातील मोठा अडसर दूर केला. महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सुमारे ११० मीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ही बांधकामे अडथळा ठरत होती. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम होत होता. कारवाईनंतर आता रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा असून, विशेषतः स्वामी विवेकानंद मार्गावर आणि कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.
ही कारवाई परिमंडळ ७ चे उपायुक्त मनिष वळंजू आणि ‘आर दक्षिण’ विभागाच्या सहायक आयुक्त आरती गोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईसाठी चार जेसीबी, ४० कामगार आणि १० अभियंते तैनात करण्यात आले होते. परिसरात धूळ उडू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मिस्ट मशिन्सचा वापर करण्यात आला. नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि अधिक प्रशस्त रस्ता उपलब्ध होईल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

