मुंबई : मुंबईत बेस्ट बसचा ट्रकला धडकून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसमधील पाच ते सहा प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने जात होती. गोरेगाव परिसरातील वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन जाताना बेस्ट बसचा ताबा सुटला. यावेळी प्रचंड वेगात होती. नियंत्रण सुटल्यामुळे बेस्टने बसने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक जोरदार असल्यामुळे बसमधील पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात बेस्ट बसचा पुढील एका बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. धडकेमुळे ट्रकच्या मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. ही धडक खूप जोरदार होती. त्यामुळे दोन्ही वाहनांचे काही भाग तुटून रस्त्यावर पडले. सकाळची वेळ असल्यामुळे बेस्ट बसमध्ये तुरळक प्रवासी होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बस चालकाविरुद्ध वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी बेस्ट बस चालकाला अटक केली आहे. अपघात घटनास्थळावरील एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये बेस्ट बसचा पुढचा भाग पूर्णपणे तुटला असून प्रवाशांचा बाहेर पडण्याचा दरवाजा धडकेने वाकलेला दिसतो. ट्रकचा मागचा भागही मोठ्या प्रमाणात चक्काचूर झालेला दिसतो. पोलिसांनी निष्काळजीपणा किंवा वेग हे प्राथमिक कारण आहे का हे शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.







