कोल्हापुर : कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आलीय. यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टर माईंड असून त्याच्यासह ५ जणांना अटक करण्यात आलीय. मिरज मधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई केली असून यात इनोव्हा कारसह १.११ कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय.
मास्टर माईंड पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार (वय ४४, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावड, जि. कोल्हापूर), सुप्रीत काहाण्या देसाई (वय २२, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर), सिध्देश जगदीश म्हात्रे (वय २८, रा. रिध्द गार्डन, ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चलनातील पाचशे, दोनशे रुपयांच्या हुबेहूब नोटा तयार करून त्या खपवण्यासाठी मिरजेत आलेल्या एकाला अटक करून सखोल चौकशीनंतर कोल्हापूर पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या मास्टर माईंडसह कोल्हापूर जिल्ह्यातील चौघासह मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा कारसह १.११ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.