पुणे : एमपीएससी पेपर विक्री प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आणखी दोन जणांना अटक केली आहे. यातील एकाला महाराष्ट्रातून, तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वीच पोलिसांनी तिघांना अटक केली होती, त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या टोळीने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधल्या रात्री प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्यांनी तब्बल ४० लाख रुपयांची मागणी केली होती. या संदर्भातील फोन कॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २ फेब्रुवारी घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ४० लाखांची मागणीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात दोघांना अटक केली आहे. योगेश सुरेंद्र वाघमारेला (२७ वर्षे) याला भंडारा जिल्ह्यातून तर दीपक यशवंत साकरेला (२७ वर्षे) याला मध्यप्रदेशातील बालाघाटमधून अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्याचे आमिष दाखवले होते. योगेश आणि दीपक यांनी परीक्षेपुर्वी काही विद्यार्थ्यांना फोन करून प्रश्नपत्रिका पुरवण्याचे आमिष दिले होते. या फोनची कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती आरोपींनी फोन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत या दोघांना अटक केली आहे.





