मुंबई : मुंबईत नवीन वर्ष आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क झाले असून, पायधुनी पोलिसांनी मशीद बंदर आणि ओशिवरा येथे कारवाई करून तब्बल ३६ कोटी रुपयांचा हेरॉइन या अमली पदार्थाचा साठा जप्त केला. याप्रकरणी आतापर्यंत सहा पुरुष, तीन महिलांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विक्रेत्यापासून पुरवठादाराचा समावेश आहे.
पोलिस उपायुक्त विजयकांत सागर आणि वरिष्ठ निरीक्षक, पायधुनी पोलिस ठाणे विनोद गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली १६ डिसेंबरला निरीक्षक सलीम खान, उपनिरीक्षक सचिन लहामगे, अनिल वायाळ यांच्या पथकाने मशीद बंदरच्या पी. डीमेलो रोड येथून जलाराम नटवर ठक्कर आणि वसीम मजरुद्दीन सय्यद या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सव्वाकोटी रुपये किंमतीचे हेरॉइन सापडले. विक्रीसाठी आलेल्या दोघांनी हे अमली पदार्थ कुठून आणले याचा पोलिसांनी तपास केला. त्यांच्या चौकशीत रूबीना खान हिचे नाव पुढे आले. तिने चौकशीमध्ये हे अमली पदार्थ शबनम शेख या महिलेने दिल्याचे सांगितले. गायब झालेल्या शबनमला पोलिसांनी राजस्थान येथून शोधून काढले. अटक करण्यात आलेले चौघेही आरोपी हे विक्रेते असल्याने त्यांना या अमली पदार्थाचा पुरवठा कुणी केला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्यावेळी मुस्कान शेख या आणखी एक महिलेचे नाव पुढे आले. पोलिसांनी तिला मशीद बंदर परिसरातून अटक केली. मुस्कानकडे केलेल्या चौकशीत या साखळीचा मुख्य सूत्रधार मेहरबान अली असल्याचे समजले. त्यानेच अब्दुल शेखमार्फत हेरॉइन पाठवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून १ कोटी ३८ लाखांचे हेरॉइन जप्त केले.







