पुणे : जास्त परताव्याच्या आमिषाने ऑनलाइन पद्धतीने पैसे गुंतवणूक केलेल्या संगणक अभियंत्याची ४६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार जुनी सांगवीत उघडकीस आला. याप्रकरणी ५४ वर्षीय अभियंत्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली. समूहातील लोकांना गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळत असल्याची माहिती दिली. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादीने ३१ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवली. तसेच आणखी एक अॅप डाऊनलोड केले. अॅपच्या माध्यमातून फिर्यादीला १७ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. पैसे परत न देता एकूण ४६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करित आहेत.







