मुंबई : अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई झोनल युनिटचे ४७ कोटींचं कोकेन जप्त केलं आहे. ही कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. एका महिला प्रवाश्याकडून सुमारे ४.७ किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे ४७ कोटी रुपये आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्याला गुप्त माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे कोलंबोहून मुंबईत आलेल्या एका महिला प्रवाशाला विमानतळावर थांबवले. तिच्या सामानाची तपासणी केल्यावर कॉफी पावडरच्या नऊ पाकिटांमध्ये लपवलेले पांढऱ्या रंगाचे पदार्थ आढळले. एनडीपीएस फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यावर ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर तत्काळ पुढील सापळा रचून विमानतळावरच त्या कोकेनचा अपेक्षित प्राप्तकर्ता असलेल्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे. पुढील तपासादरम्यान या तस्करी साखळीत गुंतलेल्या आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ते या अमली पदार्थांच्या वित्तपुरवठा, लॉजिस्टिक्स, संकलन आणि वितरणाशी संबंधित होते. याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अमली पदार्थ आणि मनोव्यापारिक पदार्थ (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.







