पुणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटाना थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना घडत असतात. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारूच्या बिलाच्या एकूण रकमेपेक्षा दहा रुपये कमी दिल्याच्या कारणावरून ग्राहकाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच ग्राहकाच्या डोक्यात बिअरच्या बाटलीही फोडली आहे. ही घटना नवले पुलाजवळील चैतन्य बारमध्ये घडली आहे. याप्रकरणी तीन बार कर्मचाऱ्यांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी नऱ्हे येथील मानाजीनगर येथे राहणाऱ्या तरुणाने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हा त्याच्या मित्रांसह बारमध्ये गेला होता. दारूचे बिल देताना त्याने १० रुपये कमी दिल्याचे कारण सांगत बारमधील काउंटरवरील तीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यात आली. वादात बारमधील कर्मचाऱ्याने तक्रारदाराच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या हल्ल्यात तक्रारदार जखमी झाला आहे.





