मुंबई : कुख्यात गुंड डी. के. रावला मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. खंडणी प्रकरणाच्या सुनावणीसाठी सत्र न्यायालयात आला असता राव याला त्याच्या अन्य दोन साथीदारांसह अटक करण्यात आली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या वर्षातील त्याची ही दुसरी अटक आहे. बांधकाम व्यावसायिक निमित बुटला याने एका गृहनिर्माण प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले होते. मात्र प्रकल्प पूर्ण केला नव्हता. गुंतवणूकदारांचे १ कोटी थकवले होते. गुंतवणूकदारांनी यासाठी पैशांसाठी तगादा लावला होता. तेव्हा निमितने डी. के. रावची मदत घेतली होती. डी. के. राव याचा साथीदार अनिल परेरा याने मध्यस्ती केली होती. राव आणि परेरा यांनी तक्रारदार गुंतवणूकदाराला धमकावले होते. याबाबत या गुंतवणूकदाराने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात नुकताच डी. के. रावसह निमित बुटला आणि रावचा साथीदार अनिल परेरा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
डी. के. रावला जानेवारी महिन्यात एका हॉटेल व्यावसायिकडून अडीच कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात तो जामीनावर सुटला होता. मात्र त्याला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती नव्हती. या खंडणीच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी डी. के. राव मुंबई सत्र न्यायालयात आला असता गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला न्यायालय परिसरातून अटक केली. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यामुळे राव अलगद गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकला. या वर्षात डी. के. रावला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.