पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उत्साह आहे.पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मतदान देखील पार पडले आहे मात्र निकाल लांबणीवर पडला. न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल हा २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र मतदान करताना देखील मतदान केंद्रावर अनेक प्रकार झाल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणी घोषणा, वाद झाले तर पुण्यामध्ये चक्क ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि २) झालेल्या मतदान प्रक्रियेच्या सुरुवात झाली. मात्र त्यापूर्वी मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान यंत्र कक्षाची महिला उमेदवारांनी पूजाअर्चा केल्याचे समोर आले. मतदान केंद्रामध्ये प्रवेश करत थेट ईव्हीएम मशीनची पूजा करून आचारसंहितेचा भंग व परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी वडगाव मावळमधील नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार व राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.







