मुंबई : हरवलेल्या मोबाईलचा शोध घेता यावा यासाठी केंद्र सरकारने सीआयईआर पोर्टल सुरु केले आहे. याच पोर्टलचा वापर करुन दहिसर पोलिसांनी हरवलेले १०२ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. अन्य पोलीस ठाण्यांनी हा कित्ता गिरविला तर हरवलेले मोबाईल फोन परत मिळू शकतात. मोबाईल फोन हरवला वा चोरीला गेला तर पोलिसांकडून हरविण्याचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे संबंधित तक्रारदाराला मोबाईल फोन कंपनीकडून अन्य समांतर सिम कार्ड मिळू शकते. अशा पोलीस ठाण्यात दोन ते तीन तक्रारी येतात. त्यामध्ये प्रामुख्याने चोरीला गेल्याच्या तक्रारी कमी असतात. रिक्षा-टॅक्सीत फोन विसरल्याच्याही घटना असतात.
ट्रेनमध्ये मोबाईल चोरी होण्याचे प्रकार लक्षणीय आहेत. एखादी चोरी झाली तर पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेणे आवश्यक आहे. परंतु पोलिसांकडून फोन हरवल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. या फोनचा शोध क्वचितच लागत असे. परंतु अशा हरवलेल्या फोनचा शोध लावण्यासाठी केंद्र सरकारने ए सेंट्र्ल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टल सुरु केले आहे. दहिसर पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक शाम रणशेवरे आणि हवालदार हेमंत विचारे यांनी याच पोर्टलचा वापर करुन हरवलेले १०१ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या पोर्टलद्वारे मोबाईल फोनचा शोध घेता येतो. मात्र त्यासाठी पोलिसांनी थोडी मेहनत घ्यावी लागते. या दोन्ही पोलिसांनी या पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तब्बल १०२ मोबाईल फोन परत मिळवले आहेत.







