डोंबिवली : डोंबिवली शहराजवळील शिळफाटा रस्त्यावरील लोढा प्रीमिअर येथील लिवियाना इमारतीमधील ए विंगमधील एका सदनिकेत ऑनलाईन माध्यमातून जुगार अड्डा चालविला जात आहे. या माध्यमातून सामान्य लोकांची फसवणूक केली जात आहे. अशी माहिती मिळाल्यावर ठाणे खंडणी विरोधी पथकाने या अड्ड्यावर छापा मारून उल्हासनगर शहरासह उत्तराखंडमधील एकूण अकरा जुगार खेळणाऱ्यांवर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
या ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून जुगार खेळणाऱ्यांना या माध्यमातून काही मिनिटात झटपट रक्कम मिळते, असे आमिष हे जुगारी दाखवत होते. यासाठी खास संकेतस्थळे तयार करण्यात आली होती. या सर्व हालचाली ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या निदर्शनास आल्या. खंडणी विरोधी पथकाने या जुगार अड्ड्यावर पाळत ठेऊन शुक्रवारी डोंबिवली जवळील लोढा प्रीमिअर येथील एका सदनिकेतील ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारला. ऑनलाईन माध्यमातून संपर्कात असलेल्या उल्हासनगर आणि उत्तराखंड येथील अकरा जुगारींवर गुन्हा दाखल केला. जुगार खेळणारे बहुतांशी तरूण गटातील आहेत. ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांमध्ये उल्हासनगरमधील यश वसिटा (२५, रा. श्रीराम चौक, उल्हासनगर), गौतम सत्यवासी (२२, रा.उल्हासनगर), गौरव कुमार (२१, रा. उधमसिंग, उत्तराखंड), कुणाल कुमार (२१, रा. उत्तराखंड), संजय कुमार (२२, उत्तराखंड), अरूण वसिटा (२६, श्रीराम चौक, उल्हासनगर), सागर वसिटा (२६, रा. उल्हासनगर), मालक याॅस बाबू भाई, चाचा, बाई बाॅस, एक गट प्रमुख यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.







