मुंबई : भारतातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये एक अज्ञात व्यक्ती १४ दिवसांपासून बेकायदेशीरपणे राहत होता. या प्रकरणामुळे आयआयटी मुंबईच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
कर्नाटकातील मंगळुरू येथील २२ वर्षीय संशयित बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला १७ जून रोजी कॅम्पस सिक्युरिटीने अटक केली आणि नंतर पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही त्याने संस्थेच्या कॅम्पसमध्ये कशी घुसखोरी केली आणि तो रात्री कुठे राहिला, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाकडे संभाव्य धोका म्हणून पाहिले जात असून, सुरक्षा व्यवस्तेकडूननेक प्रकारचे संशय व्यक्त केले जात आहेत. आरोपी कॅम्पसमध्ये कसा घुसला, कुणासाठी घुसला, कोणावर लक्ष ठेवून होता का? तो हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी होता का? याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही व्यक्ती एखाद्या मोठ्या नेटवर्कचा भाग असण्याची किंवा काही विशिष्ट सूचनांवर काम करत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे या प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






