मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट बससेवेत तिकीट खरेदीसाठी युपीआय (UPI) द्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेस्ट समिती सदस्य अजय सिंह यांनी यासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधत, प्रवाशांना तिकीटासाठी क्यूआर कोड स्कॅन करून काही सेकंदांत पैसे भरण्याची सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे. देशभरात डिजिटल व्यवहारांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असून, बंगळुरू, हैदराबाद, भुवनेश्वर आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बेस्ट बससेवेतही ही सुविधा सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बेस्टच्या नियमित प्रवाशांसाठी ‘चलो’ ॲप, स्मार्ट कार्ड आणि बस पासची सुविधा उपलब्ध असली, तरी अधूनमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अजूनही रोख रकमेवर अवलंबून राहावे लागते. सुट्ट्या पैशांअभावी प्रवासी आणि वाहक यांच्यात निर्माण होणारी गैरसोय टाळण्यासाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली आहे.
युपीआयद्वारे तिकीट खरेदीची सुविधा सुरू झाल्यास प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची गरज कमी होईल आणि क्यूआर कोड स्कॅन करून काही क्षणांत तिकीटाचे पैसे भरता येतील. त्यामुळे सुट्ट्या पैशांची अडचण, रोख व्यवहार, पैसे मोजणे आणि उर्वरित रक्कम परत देण्यामध्ये होणारा वेळ वाचेल. परिणामी, तिकीट वितरण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल. या सुविधेचा फायदा केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर बेस्ट प्रशासन आणि वाहकांनाही होणार असून, रोख व्यवहारांचे प्रमाण कमी झाल्याने कामकाज अधिक सुलभ होईल. मुंबईकरांनी नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला असल्याने, बेस्ट बससेवेतही डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू करण्याची मागणी अधिक जोर धरत आहे. प्रवाशांची सोय, वाहकांचा वेळ आणि बेस्ट प्रशासनाची कार्यक्षमता लक्षात घेऊन आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सर्व बसमध्ये युपीआय आधारित तिकीट पेमेंटची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

