मीरा–भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची वर्णी लागली आहे. तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील विराजमान होणार आहेत. डिंपल मेहता या आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी आहेत. डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर झाल्या झाल्या आहेत. तर ध्रुवकिशोर पाटील हे नरेंद्र मेहता यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू म्हणून ओळखले जातात. आज दोघांनी आज आपल्या पदाचा कारभार सांभाळला आहे. दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार नरेंद्र मेहता यांचे आभार मानले आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डिंपल मेहता यांची एकमताने महापौरपदी निवड झाली आहे. १९ नगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर महापौर निवड प्रक्रियेचा भाग म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आवारात ही निवडणूक झाली. मराठी एकीकरण समितीच्या विरोधाला न जुमानता मतदान संपले आणि डिंपल मेहता यांना स्पष्ट बहुमत मिळाले.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. मराठी एकीकरण समितीने केवळ मराठी महापौरच हवा असा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु भाजपने या विरोधाकडे दुर्लक्ष करून निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवली. अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही. मतदानादरम्यान, ७८ भाजपा नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाने डिंपल मेहता यांच्या बाजूने मतदान केलं. अशा प्रकारे, एकूण ७९ मतांसह, डिंपल मेहता महापौरपदी निवडून आल्या. या प्रक्रियेदरम्यान, महानगरपालिकेच्या सभागृहात विरोध आणि पाठिंबा दोन्हीचे स्पष्ट चित्र दिसून आले. उपमहापौरपदासाठी महापौरांसह मतदान झालं. भाजपाचे ध्रुवकिशोर पाटील यांना एकूण ७९ मते मिळाली आणि ते मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी नियुक्त झाले. मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या १६ नगरसेवकांनी काँग्रेसच्या उमेदवार रुबिना शेख यांना पाठिंबा दिला. डिंपल मेहता यांना ७९ मतं मिळाली, तर रुबिना शेख यांना १६ मतं मिळाली. अशा प्रकारे डिंपल मेहता मोठ्या फरकाने विजयी झाल्या. मतदानाच्या आकडेवारीवरून भाजपची सभागृहात स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट झाले. डिंपल मेहता अमराठी महापौर असल्याने शहराच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. मराठी एकीकरण समितीने मनसेसह महापालिकेबाहेर निदर्शने केली आणि फक्त मराठी महापौरांची मागणी पुन्हा मांडली.







