नाशिक : देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत, मोठ्या पासून ते छोट्या पर्यंत सगळी कडे आपल्याला तिरंगा रंग पाहायला मिळतो. मुलांच्या खिशावर, हातात आपल्याला तिरंगा दिसतो. एकीकडे नाशिकच्या मालेगावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत होता. तर दुसरीकडे मालेगावात दुर्घटना घडली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर फुगे घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांजवळ अचानक नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये ४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना मालेगावातील कॉलेज बस स्टॉप येथे घडली.
या दुर्घटनेत दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुषासह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. या दुघटनेत जखमी झालेल्यांची नावे विनोद थोरात,मोहित जाधव,अतुल शेवाळे,प्रमिला यादव आणि उज्वला महाजन असे आहेत. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून हा स्फोट कसा झाला याचे नेमके कारण तपासले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.







