पुणे : शहरातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात विना हेल्मेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि नागरिकांवर आता कडक कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. रस्ता सुरक्षिततेबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारी आणि शिथिल होत चाललेल्या शिस्तीकडे लक्ष वेधत रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने सोमवारी (दि. २४) व्यापक मोहीम राबवली. पहिल्याच दिवशी तब्बल ११९ विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई विशेषतः पुणे महापालिका, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे आरटीओ कार्यालय अशा नागरिकांच्या मोठ्या वर्दळीच्या शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर करण्यात आली. एकूण ११९ जणांवर दंड ठोठावण्यात आला.
यापूर्वी काही दिवस नियमित तपासणीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर पुन्हा सुरू केला होता. परंतु नंतर कारवाई थंडावल्यानंतर कर्मचार्यांनी पुन्हा दुर्लक्ष करायला सुरुवात केल्याचे आरटीओच्या निरीक्षणात आले. यावर कठोर भूमिका घेत न्यायमूर्ती सप्रे यांनी पुणे दौऱ्यात स्पष्ट सूचना दिल्यानंतर प्रशासन पुन्हा सक्रिय झाले. रस्ता सुरक्षा नियमांची अंमलबजावणी पाळली जावी आणि सरकारी कार्यालयांपासूनच आदर्श निर्माण व्हावा, या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विना हेल्मेट येणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने अशा मोहिमा नियमितपणे राबविणे गरजेचे असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले. दरम्यान, वायुवेग पथकाद्वारे ही कारवाई सतत सुरूच राहणार असून पुढील काळात आणखी व्यापक तपासणी केली जाणार असल्याचेही आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







