मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सव्वासात कोटी रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजासह प्रतिबंधीत औषधे जप्त केली. चार विविध कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली.
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एकूण ७ किलो ३१८ ग्रँम हायड्रोपोनिक गांजा व १०० मि.ली. क्षमतेच्या कोडीन फॉस्फेट असलेल्या ९९ खोकल्याच्या औषधाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या चार प्रकरणांमध्ये एकूण चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. पहिल्या कारवाईत संशयाच्या आधारावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवले. त्याच्या ट्रॉली बॅगेतून ६१० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. प्रवाशाला एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईतही हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बँकॉकहून आलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगेतून ५२५६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणातही प्रवाशाला अटक करण्यात आली. तिसऱ्या कारवाईत सीमाशुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगेतून १४५२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा हस्तगत करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.







