मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दिशेने बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गुरुवारी बेस्टने आपल्या ताफ्यात १,५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. या निर्णयामुळे शहरातील बससेवेला मोठी चालना मिळणार असून, बंद पडलेल्या अनेक मार्गांवर पुन्हा बससेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राइव्ह (PM e-Drive) योजनेअंतर्गत या ९ मीटर लांबीच्या मिडी इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे बंद पडलेल्या सुमारे १२५ बसमार्गांवर या बसेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी बससेवेपासून वंचित राहिलेल्या हजारो प्रवाशांना पुन्हा सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (CESL) यांच्या माध्यमातून स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार मे. मुंबई विद्युत वाहन ऑपरेशन प्रा. लि. आणि मे. साई ग्रीन ईव्हीएम प्रा. लि. या दोन कंपन्यांना बसेस चालविण्याचे आणि त्यांची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी ‘वेट-लीज’ पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून, या पद्धतीत खासगी कंत्राटदार बस, चालक, देखभाल, विमा आणि इतर संचालन खर्च उचलतो. तर बेस्टकडून कंडक्टरची नियुक्ती, तिकीट विक्री, महसूल व्यवस्थापन आणि डेपोमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे बेस्टला नवीन बसेस खरेदी करण्याचा किंवा त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र खर्च करण्याची गरज भासत नाही.
या नव्या इलेक्ट्रिक बसेसचा सर्वाधिक फायदा मुंबईच्या पूर्व उपनगरांना होणार आहे. विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग आणि इतर अरुंद रस्ते तसेच चढ-उतार असलेल्या भागांमध्ये २८ आसनी, ९ मीटर लांबीच्या मिडी बसेस अधिक प्रभावी ठरणार आहेत. मोठ्या १२ मीटर बसांना ज्या ठिकाणी अडचणी येतात, त्या मार्गांवर या बसेस सहज धावू शकतील. त्यामुळे निवासी भाग, मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांदरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. प्रवाशांना कमी प्रतीक्षा वेळ, अधिक वारंवार सेवा आणि आरामदायी वातानुकूलित प्रवासाचा लाभ मिळेल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे, कारण इलेक्ट्रिक बसेसमुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होईल. तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासही मदत मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने या बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर उपक्रमातील एकूण बससंख्या सध्याच्या सुमारे ४०० वरून ५२५ पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे प्रवाशांना अधिक व्यापक, जलद आणि विश्वासार्ह बससेवा उपलब्ध होणार असून, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि शाश्वत स्वरूप देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

