वृत्तसंस्था : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात आयोजित संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारत मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला. देशात बेरोजगारी ही अत्यंत गंभीर समस्या बनली असून शिक्षण व्यवस्थेसमोरही मोठी आव्हाने उभी असल्याचे त्यांनी सांगितले. “भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. काहीजण याकडे दुर्लक्ष करतील, माध्यमेही त्याकडे दुर्लक्ष करू शकतात, पण बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान मॉडरेटर लिडिया पोलग्रीन यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांतील सुशिक्षित तरुणांमध्ये वाढत चाललेल्या असंतोषाकडे लक्ष वेधले. रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने आणि भविष्यासंदर्भात स्पष्ट दिशा दिसत नसल्याने तरुणांमध्ये निराशा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही या परिस्थितीचा अभ्यास करत आहोत. तरुणांना स्वतःचे भविष्यच दिसत नाही, हीच सर्वात मोठी समस्या आहे,” असे ते म्हणाले. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे शिक्षित युवकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी तरुण आणि त्यांच्या पालकांमधील करिअर निवडीवरील मतभेदांचाही उल्लेख केला. पूर्वीच्या पिढीला उपलब्ध असलेल्या संधी आजच्या तरुणांना मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्याने अनेक तरुण पालकांच्या करिअरविषयक सल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे त्यांनी सांगितले. “तरुण आपल्या पालकांना सांगत आहेत की, तुम्हाला ज्या मार्गाने यश मिळाले, तो मार्ग आज आमच्यासाठी परिणामकारक राहिलेला नाही,” असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सी. आर. केशवन यांनी राहुल गांधींवर परदेशात भारताची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप केला. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताबाबत दिशाभूल करणारी विधाने करतात आणि देशाचा अपमान करतात, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी सध्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमानंतर शिकागो विद्यापीठालाही भेट देण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भारतातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवरील चर्चेला पुन्हा एकदा वेग आला असून राजकीय वर्तुळातही या विषयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

