मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व भेसळमुक्त खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत विशेष तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या मोहिमेत २८ खाद्य व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर एका आस्थापनेचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. कारवाईदरम्यान १३ लाख ८७ हजार ८९१ रुपये किमतीचा २ हजार ३९६ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. नागपाडा येथील ताहुरा स्वीट्स अँड बेकरी येथे ४२ किलो मावा अस्वच्छ परिस्थितीत व खोलीच्या तापमानात साठवलेला आढळला. तर मालाड येथील जेठाराम चुनिराम पुनिया यांच्याकडून १ हजार ४५२ किलो काजू कतली, केसर काजू कतली, विविध मिठाई आणि खजूर बर्फी जप्त करण्यात आली. विनापरवाना उत्पादन आणि लेबलशिवाय विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, वर्सोवा येथील महियार स्वीट अँड स्नॅक्स आणि विलेपार्ले येथील जामनगरी स्वीट्स अँड फरसाण येथे मिठाईमध्ये अतिरिक्त रंगाचा वापर झाल्याचेही निदर्शनास आले.
माटुंगा येथील बृजवासी काशिनाथ भगवानदास येथून संशयित निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला, तर गोवंडी, घाटकोपर, कांदिवली, विक्रोळी, मानखुर्द, मलाड आदी परिसरांतील मिठाई दुकाने, डेअरी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही विविध खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या मोहिमेत टॉसिन पिझ्झा (वरळी), दुर्गा वडापाव सेंटर (खार), नित्यानंद भुवन हिंदू हॉटेल, द मराठा किचन, हॉटेल अन्नपूर्णा, बॉम्बे फरसाण मार्ट, कृष्णा व्ही डेअरी अँड स्वीट्स, बिर्याणी बाय किलो, जंबो बर्गर, ब्लिंक कॉमर्स आणि झेप्टो यांसारख्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच बोरीवली पश्चिम येथील राजधानी बिर्याणी सेंटरचा व्यवसाय अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंद करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय, राज्यभरातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधी मोहिमेत मुंबईतून २९ हजार २६८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करून संबंधित आस्थापना सील करण्यात आली आहे.

