मुंबई : महाराष्ट्र शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (बीएमसी) सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘आश्रय’ योजनेअंतर्गत हक्काची घरे देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा करत घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे १२ हजार सफाई कर्मचाऱ्यांना आधुनिक सेवा निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तांत्रिक अडचणी दूर करून ३० जून २०२८ पर्यंत सर्व घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला सुमारे ३०० चौरस फुटांचे सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज घर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ३,१०७ सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून, कुलाबा येथील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या ३९ वसाहतींपैकी ३६ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार असून, त्यासाठी ४ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा महाप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १,१२० कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. पुनर्विकासातून उभारल्या जाणाऱ्या बहुमजली इमारतींमुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षित, आधुनिक आणि कामाच्या ठिकाणाजवळच कायमस्वरूपी निवासाची सुविधा मिळणार आहे. मुंबईची स्वच्छता राखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने ‘आश्रय’ योजना महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, त्यांच्या निवासाच्या प्रश्नाला कायमस्वरूपी समाधान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
