मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपयांची सण उचल तसेच महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याची घोषणा केली. एसटीतील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा योग्य सन्मान करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि अखंड सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत हा लाभ देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्यामुळे एसटी महामंडळाचे भविष्य अधिक सक्षम आणि उज्ज्वल होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. तसेच, कर्मचाऱ्यांनी आंदोलन किंवा संपाचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन करत त्यांनी संवादातून सर्व प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका स्पष्ट केली. एसटी ही राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असून, कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यावर त्यांनी भर दिला. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक असल्याचे सांगत त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शासन कायम सकारात्मक राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, दिवाळीपूर्वी मिळालेल्या या आर्थिक दिलास्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा सण अधिक आनंदात साजरा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

