नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने पार्सल वाहतुकीत मोठा बदल करत ‘घर से घर तक’ या नव्या डोअर-टू-डोअर पार्सल सेवेची घोषणा केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना आता पार्सल बुक करण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाण्याची गरज भासणार नाही. रेल्वेच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंट करून ग्राहक आपल्या घरातूनच पार्सल उचलण्याची सुविधा मिळवू शकतील. प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर ही सेवा दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळूर या आठ प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पार्सल वाहतुकीचा खर्च खासगी कुरिअर कंपन्यांच्या तुलनेत कमी होण्याची अपेक्षा असून, लघुउद्योजक, ऑनलाइन विक्रेते आणि सामान्य ग्राहकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. ‘घर से घर तक’ या विशेष ॲपद्वारे ग्राहक थेट सेवा प्रदात्यांशी जोडले जाणार असून, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.
या सेवेअंतर्गत लॉजिस्टिक्स कंपनी ग्राहकाच्या घरातून पार्सल उचलून संबंधित रेल्वे स्थानकावर आणेल. त्यानंतर रेल्वेमार्फत ते पार्सल गंतव्य स्थानकापर्यंत पोहोचवले जाईल आणि तेथून दुसरी लॉजिस्टिक्स कंपनी संबंधित पत्त्यावर पार्सलची सुरक्षित डिलिव्हरी करेल. उदाहरणार्थ, मुंबईहून पुण्याला पार्सल पाठवायचे असल्यास कंपनी प्रथम ग्राहकाच्या घरातून पार्सल घेऊन मुंबई रेल्वे स्थानकावर आणेल, त्यानंतर रेल्वेने ते पुण्यात पोहोचवले जाईल आणि शेवटी निश्चित पत्त्यावर वितरित केले जाईल. पार्सलचे पॅकेजिंग आणि आवश्यक हाताळणीची जबाबदारीही लॉजिस्टिक्स कंपनीकडे असेल. या सेवेसाठी ट्रेन सुटण्याच्या १५ दिवसांपूर्वी बुकिंग प्रक्रिया सुरू होईल, तर ग्राहकांना प्रवासाच्या २४ तास आधीपर्यंत पार्सल बुक करता येईल. ट्रेन सुटण्याच्या किमान एक तास आधी संबंधित कंपनीने पार्सल रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करणे बंधनकारक असेल. या आधुनिक सेवेच्या माध्यमातून भारतीय रेल्वे पार्सल वितरण अधिक जलद, सुलभ आणि किफायतशीर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आहे.

