मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात साजरी होणार आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्याचे वेतन मिळावे, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून एसटी महामंडळाला ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे वेतन वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान दिले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात सणापूर्वी पगार पडावा, अशी मागणी होत होती. कुटुंबासाठी खरेदी, घरगुती खर्च आणि सणाचे नियोजन वेळेत करता यावे, यासाठी वेतन लवकर देण्याची गरज लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाने निधी मंजूर करत दिवाळीपूर्वी वेतन वितरणाचा मार्ग प्रशस्त केला आहे.
एसटी महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असले, तरी त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या सणावर बसू नये, यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला सरकारशी समन्वय साधून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याचे आणि वेतन वितरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शासनाने ३९१.०२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळणार असून सणाचा आनंद अधिक द्विगुणित होणार आहे. वेतन वेळेत मिळाल्याने बाजारपेठेतील खरेदीलाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे एसटी कर्मचारी आणि विविध कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, दिवाळीपूर्वी पगार मिळाल्याने यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार असल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

