मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या महोत्सवाची घोषणा केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत हा महोत्सव १५ ते १८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. नव्या पिढीतील निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटकर्त्यांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच मराठी चित्रपटांना जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. यंदाच्या महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, तर क्युरेटर म्हणून डॉ. संतोष पाठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासांच्या अधिकाऱ्यांनाही महोत्सवासाठी विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे.
यंदाच्या महोत्सवात चित्रपट प्रदर्शनासोबतच पाच परिसंवाद, पाच विशेष मुलाखती आणि पाच मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत. चित्रपटनिर्मितीतील तांत्रिक आणि सर्जनशील पैलूंवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकारांचे अनुभव आणि उद्योगातील विविध विषयांवरील चर्चा यामुळे महोत्सव अधिक समृद्ध होणार आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या शतकोत्तर प्रवासासह दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीवर आधारित विशेष प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. ‘पुस्तक ते सिनेमा’ या विशेष उपक्रमातून लेखक, प्रकाशक, निर्माते आणि दिग्दर्शक यांना एकत्र आणून साहित्यकृतींचे चित्रपटांमध्ये रूपांतर करण्यासाठी नवे मार्ग खुले केले जाणार आहेत. याशिवाय ‘तरुणांच्या नजरेतून महाराष्ट्र’ या विषयावरील लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निवडक तीन लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात होणार आहे. या वर्षीच्या महोत्सवाला सामाजिक बांधिलकीचीही जोड देण्यात आली आहे. महोत्सवासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले असून या शुल्कातून जमा होणारा संपूर्ण महसूल मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत दुष्काळ निवारणासाठी देण्यात येणार आहे. तसेच अधिक योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ‘डोनर पास’ अर्थात ‘सामाजिक कृतज्ञता प्रवेशिका’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणताही अनावश्यक डामडौल न करता चित्रपटकलेला केंद्रस्थानी ठेवून महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

