मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) यांनी सप्टेंबर २०२६ मध्ये झालेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिकच्या साक्षी चांडक आणि मुंबईच्या नील राजेश शहा यांनी प्रत्येकी ५०२ गुण मिळवत ८३.६७ टक्के गुणांसह देशात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला आहे. चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या यशामुळे नाशिक आणि मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑल इंडिया दुसरा क्रमांक चेन्नईच्या श्रुती व्ही हिने ४९२ गुणांसह ८२ टक्के गुण मिळवत मिळवला, तर सुरतच्या प्रेम अग्रवालने ४९० गुण आणि ८१.६७ टक्के गुणांसह तिसरे स्थान पटकावले. आयसीएआयने जाहीर केलेल्या गुणवंतांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान मिळवल्याने राज्याच्या शैक्षणिक यशात आणखी भर पडली आहे. विशेषतः नाशिकच्या साक्षी चांडकच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या सीए इंटरमिजिएट परीक्षेच्या निकालानुसार ग्रुप-१ मध्ये परीक्षा दिलेल्या १,००,३०१ उमेदवारांपैकी २३,२१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी २३.१४ टक्के इतकी आहे. ग्रुप-२ मध्ये ६८,४०० उमेदवारांपैकी १२,९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी १८.९२ टक्के राहिली आहे. दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्या ३८,३३९ उमेदवारांपैकी ५,०६६ जण उत्तीर्ण झाले असून, या गटाचा निकाल १३.२१ टक्के लागला आहे. या परीक्षेद्वारे एकूण १४,८१८ उमेदवारांनी सीए इंटरमिजिएटची पायरी यशस्वीरित्या पार केली आहे. सीए इंटरमिजिएट परीक्षा ही देशातील सर्वाधिक कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. त्यामुळे देशात संयुक्त प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या साक्षी चांडक आणि नील राजेश शहा यांच्या यशाचे विशेष कौतुक होत असून, मेहनत, सातत्य आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.
