शिर्डी : साईदर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी साईबाबा संस्थानने आणखी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. नगर-मनमाड महामार्गाला लागून असलेल्या ‘सबका मालिक एक’ मार्केटमध्ये साईबाबांचा लाडू प्रसाद विक्री कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनानंतर शिर्डीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांना आता प्रवासाच्या मार्गावरच साईबाबांचा प्रसाद खरेदी करता येणार आहे. शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने प्रसाद खरेदीसाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असते. अनेक भाविक दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेऊन थेट आपल्या गावी रवाना होतात. ही बाब लक्षात घेऊन महामार्ग परिसरात स्वतंत्र विक्री व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील गर्दी टाळून भाविकांना सहजपणे प्रसाद उपलब्ध होणार आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या निर्देशानुसार या नवीन केंद्राची कार्यवाही करण्यात आली. शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते या लाडू प्रसाद विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केंद्राची पाहणी करून व्यवस्थेची माहिती घेतली.
या उद्घाटन सोहळ्याला उपनगराध्यक्ष अभय शेळके, नगरपरिषदेचे नगरसेवक, साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, अतुल वाघ, लाडू प्रसाद निर्मिती विभागाचे प्रमुख रवींद्र गायके यांच्यासह संस्थान आणि नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. साईबाबांचा प्रसाद हा भाविकांच्या श्रद्धेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. दर्शनानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांसाठी प्रसाद घेऊन जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रसाद सहज उपलब्ध व्हावा यासाठी विक्री केंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न संस्थानकडून केला जात आहे. ‘सबका मालिक एक’ मार्केटमधील हे केंद्र महामार्गालगत असल्याने शिर्डीतून पुढे जाणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होणार आहे. वाहनातून प्रवास करताना सहज थांबून प्रसाद खरेदी करता येणार असल्याने वेळेची बचत होईल. तसेच केवळ प्रसाद खरेदीसाठी पुन्हा मंदिर परिसरात जाण्याची गरज भासणार नाही. भाविकांना जलद, सुलभ आणि सोयीस्कर सेवा मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या नवीन केंद्राचे साईभक्तांकडून स्वागत करण्यात येत आहे. शिर्डीतील भाविक सुविधांच्या विस्तारात या केंद्राची आणखी एक भर पडली आहे.







