मुंबई : राज्यातील दुभंगलेले ओठ आणि टाळू (Cleft Lip & Palate) या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना आता मोफत, दर्जेदार आणि सर्वसमावेशक उपचार मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडिया यांच्यात तीन वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या बालकांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत तपासणीत आढळलेल्या बालकांना जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर स्माईल ट्रेन इंडियाच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवले जाणार आहे. राज्यातील कोणतेही बालक केवळ आर्थिक कारणामुळे उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित जिल्हे आणि भागीदार रुग्णालयांमध्ये समन्वय साधून संपूर्ण उपचार प्रक्रिया राबवली जाणार आहे. उपचारासाठी शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, औषधे, पोषणविषयक सेवा, दंत उपचार, वाचा उपचार (स्पीच थेरपी) तसेच आवश्यक असल्यास प्रवासाची सुविधाही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भोजन, निवास व प्रवासाचा खर्चही स्माईल ट्रेन इंडिया उचलणार असून, शस्त्रक्रियेनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीवरील उपचाराची जबाबदारीही संस्थेकडे असेल. या उपक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभर तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना या विकाराची लवकर ओळख पटवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत रुग्णांची नोंद, उपचारासाठी संदर्भ आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मान्यताप्राप्त रुग्णालयात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा आणि भूलतज्ज्ञांची उपलब्धता तपासून उपचार प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली जाईल. राज्यातील वर्धा, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, लातूर, मुंबई, ठाणे, पुणे, गोंदिया, अकोला, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरसह एकूण १५ मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये हे उपचार उपलब्ध असतील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन केली जाणार असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत नियमित मूल्यमापनही केले जाईल. उपचारासंदर्भातील अधिक माहितीसाठी 1800 103 8301 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या उपक्रमामुळे हजारो बालकांना नवजीवन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.






