मुंबई : बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती लहान वयातच सोप्या, आनंददायी आणि प्रभावी पद्धतीने मिळावी, या उद्देशाने न्याय संस्था आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रत्येक बालकाने जाणून घ्यावेत असे १८ मूलभूत हक्क’ हे विशेष कलरिंग बुक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे पार पडले. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डंगरे, माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, अनिशा गोपी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात संस्थेच्या वतीने राज्यातील संविधान विषयक जनजागृतीसाठी ‘संविधान फेलोशिप’ उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. बालकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांची माहिती रंगांच्या माध्यमातून सहज समजावी, त्यांच्यात हक्कांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि संविधानाविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. हे कलरिंग बुक राज्यभरातील बालकांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पुस्तकात निवारा, पोषण, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, मोफत कायदेशीर मदत यांसह बालकांचे 18 महत्त्वपूर्ण संविधानिक आणि कायदेशीर हक्क चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले आहेत. याशिवाय बालविवाह, बालमजुरी, रॅगिंग, बुलिंग, लैंगिक शोषण आणि बालसुरक्षा यांसारख्या संवेदनशील विषयांचाही समावेश करण्यात आला असून, बालकांना सहज समजेल अशा भाषेत आणि चित्रांद्वारे त्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बालकांना त्यांच्या अधिकारांची माहिती जितक्या लवकर मिळेल, तितके ते आत्मविश्वासाने आणि सुरक्षिततेने आयुष्य जगू शकतील. हे कलरिंग बुक केवळ रंग भरण्याचे पुस्तक नसून, ते बालकांना संविधान, हक्क आणि जबाबदाऱ्यांची ओळख करून देणारे प्रभावी शैक्षणिक साधन ठरेल. रंग भरताना मुलांच्या मनावर त्यांच्या हक्कांविषयीची जाणीव सहजपणे रुजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच संविधान फेलोशिपच्या माध्यमातून कायदे, संविधान आणि नागरिकांचे अधिकार याबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान धारावी ड्रीम प्रोजेक्टच्या कलाकारांनी विशेष सांस्कृतिक सादरीकरण केले, तर बालकांच्या हक्कांवर आधारित प्रेरणादायी रॅप गीताचेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे बालकांमध्ये संविधानिक मूल्ये, समानता, सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजण्यास मदत होणार असून, बालहक्कांविषयी समाजातही अधिक व्यापक जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.






