भाईंदर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मिरा-भाईंदर शहरातील काशिमीरा आणि नवघर येथे उभारण्यात आलेल्या ५१ फूट उंच विठ्ठलाच्या मूर्तींच्या पूजन व महाआरतीचे आयोजन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या भव्य मूर्तींची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे असून, धार्मिक परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष पूजा करण्यात आली. सकाळी काशिमीरा येथील जरीमरी तलाव परिसरातील विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा, भाजप आमदार नरेंद्र मेहता, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने विठ्ठलभक्त आणि नागरिक उपस्थित होते. पूजेनंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने सामूहिक महाआरती आयोजित करण्यात आली. आरतीदरम्यान सुरुवातीला आरतीचे ताट हातात घेतलेल्या आमदार नरेंद्र मेहता यांनी काही वेळाने कीर्तनकारांकडून टाळ मागवून घेतली आणि बराच वेळ भक्तिभावाने टाळ वाजवत महाआरतीत सहभाग नोंदविला. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले गेले आणि परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
दरम्यान, भाईंदर पूर्व येथील नवघर गावात उभारण्यात आलेल्या ५१ फूट उंच विठ्ठलाच्या मूर्तीसमोरही सायंकाळी विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महाआरती होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने विठ्ठलभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील दोन्ही ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विठ्ठल भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.






