मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता (एससीएलआर) विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या वाकोला – वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पुलाच्या कामाला अंतिम स्वरूप आले आहे. सुमारे १.२ किलोमीटर लांबीचा हा महत्त्वाचा पूल मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा प्रकल्प यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र विविध कारणांमुळे त्याला विलंब झाला. आता या पुलाचे तब्बल ९८ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील १० ते १२ दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून हा पूल वाहतुकीसाठी सज्ज होण्याच्या मार्गावर आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे लोकार्पण सोहळा २५ जूननंतरच आयोजित करता येणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस हा पूल वाहनचालकांसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूल सुरू झाल्यानंतर वाकोला आणि बीकेसी दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार असून हे अंतर अवघ्या ५ ते १० मिनिटांत पार करता येणार आहे. यामुळे बीकेसीकडे जाणाऱ्या हजारो वाहनचालकांचा वेळ वाचणार असून परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मोठी मदत मिळणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या बीकेसीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पूल मोठा दिलासा ठरणार आहे.





