नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता केवळ इंधन क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर आता कर्करोग उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या Cisplatin आणि Carboplatin या औषधांच्या उपलब्धतेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. देशभरातील अनेक रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांनी या औषधांच्या वाढत्या तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वृत्तानुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून या औषधांचा पुरवठा कमी झाला असून अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये त्यांचा साठा संपत आला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून औषधांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरही त्याचा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय औषधांच्या किमतींवरील निर्बंध आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचा दावा रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे मेडिकल ऑंकोलॉजी विभागप्रमुख डॉ. श्याम अगरवाल यांनी सांगितले की, त्यांच्या रुग्णालयातील मोठ्या प्रमाणावर कर्करोग रुग्णांना या औषधांची आवश्यकता असते. तोंड, फुफ्फुस, स्तन, अंडाशय, अन्ननलिका आणि मानेच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये या औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र सध्या रुग्णांना औषधांसाठी विविध मेडिकल स्टोअर्समध्ये धावपळ करावी लागत आहे. नवी दिल्लीतील एम्सचे डॉ. अभिषेक शंकर यांनीदेखील गेल्या दोन आठवड्यांपासून तुटवडा असल्याचे नमूद केले. मुंबईतील ऑंकोलॉजिस्ट डॉ. मोहन मेनन यांनी प्लॅटिनमच्या वाढत्या जागतिक दरांकडे लक्ष वेधले. त्यांच्या मते, प्लॅटिनमचे दर २७०० रुपयांवरून सुमारे ७८०० रुपये प्रतिग्रॅमपर्यंत वाढल्याने प्लॅटिनम-आधारित औषधांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. देशातील अनेक होलसेल विक्रेते आणि पुरवठादारांकडील साठा संपत आल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.







