नवी दिल्ली : तेल आणि वायूच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) सुमारे ३० अत्यावश्यक औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, हाडांचे विकार, जीवनसत्त्वांची कमतरता तसेच अवयव प्रत्यारोपण यांसारख्या विविध आजारांवरील औषधांचा या निर्णयामध्ये समावेश आहे. किंमत नियंत्रण आदेश २०१३ अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या या नवीन किमती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. एनपीपीएने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांकडून निर्धारित किमतीपेक्षा अधिक रक्कम आकारल्यास संबंधित उत्पादक, विपणन कंपनी किंवा विक्रेत्याविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास आणि रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
नवीन दरांनुसार मधुमेहावरील एम्पाग्लिफ्लोझिन, सिटाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन या औषधांची किंमत प्रति गोळी १४.८८ रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन संयुग असलेल्या गोळ्यांची किंमत ११.९१ रुपये असेल. रक्तदाब आणि हृदयरोगांवरील बिसोप्रोलोल फ्युमरेट व अॅम्लोडिपिन यांची किंमत प्रति गोळी ९.४० रुपये निश्चित करण्यात आली आहे. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या टॅक्रोलिमस प्रोलाँग्ड-रिलीज कॅप्सूलची किंमत १२७ रुपये प्रति कॅप्सूल ठेवण्यात आली आहे. याशिवाय व्हिटॅमिन डी३ ओरल सोल्युशनची किंमत प्रति मिली १४.९१ रुपये, तर मिथाइलकोबालामिन, एल-मिथाइलफोलेट कॅल्शियम आणि पायरीडॉक्सल-५ फॉस्फेटयुक्त गोळ्यांची किंमत १९.७८ रुपये प्रति गोळी निश्चित करण्यात आली आहे. वेदनाशामक जेलची किंमत प्रति ग्रॅम ३.३१ रुपये असेल. औषध विक्रेत्यांना किंमत सूची दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले असून, निर्धारित दरापेक्षा अधिक किंमत आकारल्यास अतिरिक्त रक्कम व्याजासह सरकारी तिजोरीत जमा करावी लागेल. ग्राहकांनी औषध खरेदी करताना एमआरपी तपासावी आणि जादा दर आकारल्यास तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






